डॉन का इंतजार तो ग्यारा मुल्को की पुलिस कर रही है …मगर डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, हा चित्रपटातील सुप्रसिद्ध संवाद आपण अनेकदा ऐकला असेल. अगदी अकरा देशांचे नाही पण निदान दिल्ली पोलीस तरी सध्या ‘डॉन’च्या शोधात आहेत. घरगुती हिंसाचार आणि खुनाचा आरोप असणारे दिल्लीचे माजी विधिमंत्री सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याने घेतलेले नाट्यमय वळण त्यासाठी कारण ठरले आहे. भारती यांच्यावरील आरोपांची शहानिशा करण्यासाठी त्यांच्या ‘डॉन’ नावाच्या कुत्र्याला ताब्यात देण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. डॉन कुठे आहे?, आमच्या चौकशीसाठी तो अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, तो अजूनही सापडलेला नाही. आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे दिल्ली पोलीसांकडून सोमवारी न्यायालयाला सांगण्यात आले. त्याचबरोबर न्यायालयाने भारती यांच्या लॅब्राडोर जातीच्या कुत्र्याचा ताबा आमच्याकडे द्यावा, अशी मागणीही पोलिसांनी केली आहे. सोमनाथ भारती यांच्या सांगण्यावरून हा कुत्रा गर्भार अवस्थेत असणाऱ्या लिपिका यांना चावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कुत्र्याची चौकशी होणे खूप महत्त्वाचे असल्याचे पोलीसांनी सांगितले. मात्र, सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यापासून डॉन बेपत्ता आहे. आम्ही भारती यांच्या घरी आणि कार्यालयात त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आम्हाला मिळाला नाही. परंतु, भारती यांना त्याचा ठावठिकाणा माहित आहे. या कुत्र्याला ताब्यात घेतल्यानंतर लिपिका यांच्या शरीरावरील दाताचे व्रण त्याचेच असल्याची पुष्टी करता येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी भारती यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार आणि खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा त्यांच्या पत्नी लिपिका मित्रा यांनी नोंदविला होता. त्यानंतर सोमवारी सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला तर, दिल्ली पोलिसांनी केलेला अर्ज स्वीकारून महानगर दंडाधिकारी मणिका यांनी भारती यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले होते. त्यामुळे सोमनाथ भारतींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.