दिल्ली पोलिसांनी सोमवारी अनिसिया बत्रा (वय ३९) या एअर होस्टेसच्या घरातून हिऱ्याची अंगठी आणि बीएमडब्लू कार जप्त केली. अनिसियाच्या आई-वडिलांनी तिच्या नवऱ्याला मयांक सिंघवीला या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्या होत्या. अनिसियाने १३ जुलै रोजी शुक्रवारी संध्याकाळी पंचशील पार्क येथील चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. अनिसिया घरगुती हिंसाचाराची बळी ठरल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

पोलिसांनी तपासासाठी या जोडप्याचे मोबाइल फोनही जप्त केले आहेत. अनिसियाने शुक्रवारी संध्याकाळी पंचशील पार्क येथील चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्यानंतर तिचा नवरा तिला लगेच जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अनिसिया जर्मन एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस म्हणून नोकरीला होती.

दिल्लीत हौझ खास पोलीस स्टेशनमध्ये अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे. अनिसियाचा मृतदेह दुसऱ्यांदा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून या शवविच्छेदनाचे व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. अनिसिया घरगुती हिंसाचाराची बळी ठरली तिचा हुंडयासाठी छळ सुरु होता असा आरोप तिच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने केला आहे. या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले.
अनिसियाचे वडील सैन्यातील निवृत्त अधिकारी असून अनिसियाच्या भावाने मयांक सिंघवी आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. अडीच वर्षांपूर्वी अनिसियाचे मयांकशी लग्न झाले होते. हनीमूनसाठी दोघेही दुबईत गेले होते. तेव्हा देखील मयांकने अनिसियाला दारु पिऊन मारहाण केली होती, असे अनिसियाचा भाऊ करण बत्रा याने म्हटले आहे. मयांकला दारुचे व्यसन होते आणि यासाठी तो अनिसियाकडे पैशांचा तगादा लावायचा, असे करणचे म्हणणे आहे.