दिल्ली पोलिसांनी समाजकंटकांचा  कठोर मुकाबला केला पाहिजे पण त्याचबरोबर प्रक्षोभक परिस्थितीत शांत राहिले पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या ७३ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, दिल्ली पोलीस ही देशातील व जगातील मोठी महानगरी पोलीस यंत्रणा असून त्यांनी सामाजिक अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न आतापर्यंत हाणून पाडले आहेत.

पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या १९५० मधील भाषणाचा दाखला देत ते म्हणाले की, संतप्त व प्रक्षोभक वातावरणातही दिल्ली पोलिसांनी शांतपणे परिस्थिती हाताळावी पण त्याचबरोबर समाजकंटकांचा कठोरपणे मुकाबला केला पाहिजे. हा सल्ला सरदार पटेलांनी पूर्वीच देऊन ठेवला आहे. दिल्ली पोलिसांनी त्याचे वेळोवेळी पालन केले आहे. पोलिसांवर सकारात्मक टीका केली तर त्याचे स्वागतच आहे, पण ३५हजार पोलिसांनी देशासाठी बलिदान दिले आहे हे विसरू नये.

गृहमंत्री निवासस्थानावरील मोर्चास परवानगी नाही

शाहीनबाग आंदोलकांनी शहा यांच्या निवासस्थानापर्यंत रविवारी मोर्चा काढण्याचे ठरवले होते, पण त्याला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नाही.पोलिसांनी सांगितले,की निदर्शकांनी प्रतिनिधिमंडळाचा सविस्तर तपशील द्यावा.