दिल्ली पोलिसांनी बुधवारी पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित दोन लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची सुटका केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ही माहिती दिली. एएनआयच्या वृत्तानुसार, या दोघांची नावे मोहम्मद जलील आणि इम्तियाज अशी आहे. या दोन्ही लोकांना दिल्ली पोलिसांनी दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित प्रकरणाशी संबंध असल्याच्या संदर्भात अटक केली होती. त्यानंतर बुधवारी त्याची सुटका करण्यात आली.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी छापेमारीनंतर जान महंमद शेख (४७, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (२२, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (४७, रायबरेली), झिशान कमर (२८, अलाहाबाद), महंमद अबू बकर (२३, बहराइच), महंमद अमीर जावेद (३१, लखनऊ) या सहा जणांना अटक करण्यात आल्याचे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि उत्तर प्रदेश एटीएसने मंगळवारी दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने या प्रकरणाशी संबंधित तिघांना ताब्यात घेतलं होतं. मात्र यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यातील दोघांची सुटका केली आहे. पण यातील तिसरी व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेश एटीएसने दोघांचा त्यांच्याकडे सोपवले होते.

स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी मंगळवारी स्पेशल सेलने अनेक राज्यांमध्ये या प्रकरणांमध्ये स्फोटके आणि शस्त्रे जप्त केले असल्याचे सांगितले. या सर्व सहा लोकांना दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक करण्यात आली. अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख ओसामा आणि झिशान अशी आहे.