देशाची राजधानी दिल्लीच्या बुराडीमध्ये ११ जणांच्या सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या ११ पैकी किमान एका व्यक्तीने शेवटच्या क्षणी जीव वाचवण्याची धडपड केली होती, अशी दाट शक्यता दिल्ली पोलिसांनी व्यक्त केली आहे.

भाटिया कुटुंबातील 50 वर्षीय भावनेश भाटिया यांनी शेवटच्या क्षणी स्वतःला फास बसू नये यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. भावनेश यांच्या हाताला बांधलेली दोरी सैल झाली होती, त्यांचे पाय जवळपास जमिनीला टेकलेल्या अवस्थेत होते. त्यांनी शेवटच्या क्षणी गळ्याचा वेढा सैल करण्याचा आणि पाय जमिनीला टेकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्या दरम्यानच त्यांचा गळ्याचा वेढा अजून घट्ट झाला आणि त्यांना फास बसला असावा, असं मत फॉरेन्सिक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हिंदुस्थान टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आत्महत्या केलेल्या सर्वांच्या तोंडावर कापड आणि पट्टी होती पण भावनेश यांच्या तोंडावरील कापड आणि पट्टीही अर्धवट निघालेली होती, त्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी इतरांनाही अलर्ट करण्याचा प्रयत्न केला असावा अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. जेव्हा मृतदेह पाहिला त्यावेळी भावनेश यांचा एक हात घशाजवळ हवेत लटकत होता असं एका पोलीस अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितलं.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आतापर्यंत 130 जणांकडे विचारपूस केली आहे. यामध्ये नातलग, शेजारी, मित्रपरिवार अशांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण –
बुराडी येथील संत नगरमध्ये रविवारी सकाळी एकाच घरात ११ मृतदेह आढळले आणि एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये भाटिया कुटुंबातील सात महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. भाटिया कुटुंबाने रोजच्या प्रमाणे सकाळी सहा वाजता दुकान न उघडल्याने शेजाऱ्याने डोकावून पाहिलं असता त्यांना घरात मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. यानंतर ही घटना उघडकीस आली.
११ पैकी १० मृतदेह लाटकलेल्या अवस्थेत होते. तर इतरांपासून दूर एका वृद्ध महिलेचा मृतदेह फरशीवर पडलेल्या अवस्थेत सापडला होता. या सगळ्यांच्या डोळ्यावर आणि तोंडावर पट्टी बांधलेली होती. तर हात मागे बांधलेल्या स्थितीत होते.

मृतांची नावे-
नारायणदेवी (वय-७७), भावेश(वय-५०), ललित (वय-४५), सविता (वय-४८), टीना (वय-४२), प्रतिभा (वय-५७), प्रियांका (वय-३३), नीतू(वय-२५), मोनू (वय-२३), ध्रुव आणि शिवम (वय-15)