दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या २१ आमदारांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. या सर्व गुन्ह्य़ांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांचा समावेश आहे. बनावट पदवीप्रकरणी दिल्ली मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला अटक करण्यात आल्याने पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे.आपच्या २१ आमदारांपैकी दोघांवर विनयभंग फसवणूक असे गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.पक्षाच्या आमदारांविरुद्ध एकूण ४८ गुन्ह्य़ांची नोंद असून एका प्रकरणात तडजोड झाली आहे तर अन्य दुसऱ्या प्रकरणाचा ठावठिकाणा नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.