काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यालयात जाऊन दिल्ली पोलिसांनी चौकशी केल्याप्रकरणी काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला असला तरी, दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी याप्रकरणाची म्हणावी तितकीशी दखल घेतलेली नाही. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा भाग म्हणून अधुन-मधून अशाप्रकारची चौकशी होतच असते. या चौकशीमागे कोणताही राजकीय दबाब नसून राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी किंवा त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी हा प्रकार केल्याचा दावा त्यांनी शनिवारी पूर्णपणे फेटाळून लावला.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राच्या माहितीनूसार, मागील आठवड्यात दिल्ली पोलिसांचे एक पथक राहुल गांधी यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी पोलीसांनी तेथील लोकांकडे राहुल गांधी यांच्या शारिरिक तपशीलांची विचारणा केली. राहुल गांधी दिसायला कसे आहेत, त्यांच्या केसांचा आणि डोळ्यांचा रंग कोणता आहे, असे प्रश्न यावेळी पोलीसांकडून विचारण्यात आले. या संपूर्ण प्रकारानंतर काँग्रेस पक्षाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. हा प्रकार म्हणजे राहुल गांधी यांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप असून काँग्रेस या प्रकरणाचा विरोध करेल असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. अशाप्रकारची निरर्थक चौकशी करण्यामागे राजकीय कट-कारस्थान असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात येत होता.
मात्र, दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप फेटाळून लावले. सहाय्यक उपनिरीक्षक समशेर सिंग यांनी राहुल गांधी यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. राहुल यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या एसपीजी आणि खासगी सुरक्षारक्षकांशी समशेर यांचा सातत्याने संपर्क असतो. त्यावेळी त्यांनी सुरक्षेचा भाग म्हणून कार्यालयातील लोकांना विशिष्ट प्रश्न विचारल्याचे बी.एस. बस्सी यांनी स्पष्ट केले.