दिल्लीत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांचे ढोल ताशे वाजण्यास प्रारंभ झाला असून आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय रविवारी येथे जाहीर केला. दीक्षित या ज्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील, तेथेच आपणही आपला अर्ज दाखल करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
केजरीवाल यांनी दीक्षित यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा आग्रह आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धरला होता. त्यास प्रतिसाद म्हणून केजरीवाल यांनी ही घोषणा केली. त्यांनी या वेळी भाजपवरही टीकेची तोफ डागली. याआधी ज्या ज्या वेळी निवडणुका झाल्या, त्या वेळी भाजपने जाणूनबुजून दीक्षित यांच्यविरोधात कमकुवत उमेदवार उभा केला. आता विजय गोएल यांनी आपण आणि दीक्षित यांच्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही केजरीवाल यांनी दिले.  
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून दीक्षित यांच्याविरुद्ध थेट निवडणूक लढण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीक्षित यांनी भीतीपोटी मतदारसंघ बदलून अन्यत्र धाव घेतली तर आपण तेथेही त्यांच्याविरोधात अर्ज दाखल करू, असे केजरीवाल म्हणाले. शीला दीक्षित यांच्या विरोधात आपण का लढत आहोत, याची मीमांसा करताना दीक्षित या आता भ्रष्टाचाराचेच प्रतीक बनल्या असल्याने दिल्लीवासीयांना त्या नकोशा झाल्या असल्याची टीका केजरीवाल यांनी केली.