ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या व्यंगचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आल्याचे चित्र भाजपने वृत्तपत्रातील एका जाहिरातीद्वारे प्रकाशित केले असून, त्याबद्दल आम आदमी पार्टीने (आप) भाजपवर जोरदार टीका केली आहे. भ्रष्टाचारविरोधातील लढाईचे नेतृत्व करणाऱ्या शिलेदारांची भाजपने हत्या केली का, असा उपहासात्मक सवाल आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे.
नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ रोजी म. गांधीजी यांची हत्या केली. भाजपने आपल्या जाहिरातीमधून शुक्रवारी अण्णा हजारे यांची हत्या केली, भाजपने याबाबत माफी मागणे उचित नाही का, असा सवालही केजरीवाल यांनी केला आहे.
या जाहिरातीमध्ये केजरीवाल यांचेही व्यंगचित्र असून ते काँग्रेसचा पाठिंबा घेणार नसल्याचे आश्वासन देताना दिसत आहेत, मात्र त्याच वेळी केजरीवाल यांनी काँग्रेसशी विवाह केल्याचेही दाखविण्यात आले आहे.
काही दुष्ट शक्ती आपले लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करतील त्यापासून सावध राहावे आणि दिल्लीच्या विकासाच्या कार्यक्रमावरच लक्ष केंद्रित करावे, असे केजरीवाल यांनी आपच्या समर्थकांसाठी ट्विट केले आहे. दिल्लीत आप सरकार स्थापन करणार आहे, त्यामुळे दिल्लीकरांची सेवा करण्यास तयार राहा आणि दिल्ली महिलांसाठी सुरक्षित राहील याची काळजी घ्या, असेही केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.