दिल्लीतील बलात्कारप्रकरणी शिक्षेच्या अंमलबजावणीचे वॉरंट

देशभर खळबळ उडविणाऱ्या दिल्लीतील सामूहिक बलात्कार, खून प्रकरणी चारही दोषींना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे. तिहार तुरूंगात सकाळी सात वाजता शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयाने मंगळवारी दिले.

मुकेश (३२), पवन गुप्ता (२५), विनय  शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) यांच्या फाशीचे वॉरंट अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी जारी केले. दोषींपैकी कोणाचाही दयेचा अर्ज राष्ट्रपती किंवा कुठल्याही न्यायालयासमोर प्रलंबित नाही. तसेच शिक्षेच्या फेरविचाराची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे, असे सरकारी वकिलांनी मंगळवारी सुनावणीवेळी न्यायालयात सांगितले. फाशीचे वॉरंट आणि शिक्षेच्या अंमलबजावणीदरम्यान दोषींना पुन्हा याचिका करावीशी वाटली तर ते करू शकतात, याकडेही वकिलांनी लक्ष वेधले. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुकेश आणि विनय या आरोपींच्या वकिलांनी सांगितले.

न्यायालयाने फाशीचे वॉरंट जारी केल्यानंतर तिहार तुरुंगातील आरोपींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यांना न्यायालयाच्या आदेशाची माहिती देण्यात आली. न्यायालयाने फाशीचे वॉरंट जारी केल्याने मुलीच्या पालकांनी आनंद व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर रोजी आरोपी अक्षय याची फेरविचार याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर चारही आरोपींना दयेचा अर्ज दाखल करायचा आहे का, याची माहिती घ्यावी असा आदेश कनिष्ठ न्यायालयाने तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना दिला होता. दोषींविरोधात फाशीचे वॉरंट जारी करावे, अशी मागणी करणारी याचिका तरुणीच्या पालकांनी केली होती.

दिल्लीत १६-१७ डिसेंबर २०१२ च्या रात्री चालत्या बसमध्ये तरूणीवर बलात्कार करून हल्ला करण्यात आला होता. पीडित तरुणीचा २९ डिसेंबर २०१२ रोजी रुग्णालयात मृत्यू झाला.

या प्रकरणी २०१७ मध्ये आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. एक आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. बालगुन्हेगार असलेला एक जण तीन वर्षांची सुधारगृहातील शिक्षा भोगून बाहेर पडला आहे. दिल्ली उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय यांनी दिलेली फाशीची शिक्षा २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम केली होती.

‘माझ्या मुलीला न्याय मिळाला’

न्यायालयाच्या आदेशामुळे माझ्या मुलीला न्याय मिळाला, या चारही दोषींना फाशीची शिक्षा मिळाल्याने देशातील महिलांना बळ येईल, या निर्णयामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहील, असे पीडितेच्या आईने म्हटले आहे. दोषींना फाशी दिल्याने गुन्हेगार घाबरतील. या लढय़ात साथ देणाऱ्या संपूर्ण देशवासीयांचे पीडितेच्या आईने आभार मानले आहेत. तर पीडितेचे वडील बद्रिनाथ सिंह यांनी, न्यायालयाच्या निर्णयाने समाधानी असल्याचे म्हटले आहे.