दिल्लीत चालत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सर्व सहा आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी मंगळवारी तिच्या पित्याने केली आहे. संपूर्ण देशाला हलवून सोडणाऱ्या या घटनेतील आपल्या मुलीने केलेला संघर्ष जगाला कळावा यासाठी तिचे नाव जाहीर करण्याची मागणीही तिच्या वडिलांनी केली आहे.
दिल्ली भाजप अध्यक्ष विजेंदर गुप्ता आणि दक्षिण दिल्लीच्या महापौर सविता गुप्ता यांच्यासह संयुक्तपणे आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत दुर्दैवी तरुणीच्या पित्याने ही मागणी केली. या वेळी प्रसारमाध्यमे आपल्या मुलीचा उल्लेख सामूहिक बलात्कार झालेली पीडिता, असा करीत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या वेळी आपल्या मुलीचा असा उल्लेख केला जातो, त्या वेळी आम्हाला अतिशय दु:ख होते, अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवली.
बलात्कारपीडित महिलेची ओळख प्रसिद्ध केल्यास भारतीय कायद्यानुसार दोन वर्षांची शिक्षा आणि दंड केला जातो. मात्र या तरुणीच्या वडिलांनीच आपल्या मुलीचे नाव जाहीर करण्याबाबत हरकत नसल्याचे लेखी निवेदन दिले आहे.
दरम्यान, दिल्लीत चालत्या बसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकमेव साक्षीदार असणाऱ्या पीडित मृत तरुणीच्या मित्राने मंगळवारी साक्ष देण्यासाठी जलदगती न्यायालयात हजेरी लावली. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला पीडित मृत तरुणीचा हा २८ वर्षीय मित्र व्हील चेअरवरून अतिरिक्त सत्र न्या. योगेश खन्ना यांच्यासमोर हजर झाला.