नवी दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्ह परिसरातील राहणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयातील माजी अधिकाऱ्याच्या घरी, चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीची चोरट्यांनी धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली असून अधिकाऱ्यावरही हल्ला केला आहे. बी.आर.चावला असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते ९४ वर्षाचे आहेत. या घटनेत चावला यांची पत्नी कांता चावला यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री, चावला यांच्या सोसायटीचा वॉचमन आपल्या दोन-तीन साथीदारांसह चावला यांच्या घरी आला. कांता चावला यांनी घराचं दार उघडल्यावर, वॉचमन आपल्या साथीदारांसह घरात शिरला. आपल्याकडील शस्त्रांचा धाक दाखवत चोरट्यांनी चावला दाम्पत्याला सोफ्यावर बसण्यास सांगितलं. याप्रमाणे चावला हे सोफ्यावर बसून राहिले…पण कांता यांनी चोरट्यांना थांबण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याजवळील धारदार शस्त्राने कांता यांची भोसकून हत्या केली. यानंतर चोरट्यांनी चावला यांच्या बेडरुममध्ये जाऊन सर्व दागिने व पैसे घेऊन घटनास्थळावरुन पोबारा केला.

चोरट्यांनी पोबारा केल्यानंतर चावला यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी हाका मारल्या. शेजारील व्यक्तींनी घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांना माहिती दिली. कांता चावला यांना रुग्णालयात नेण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. चावला दाम्पत्याला दोन मुलं होतं, ज्यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. दरम्यान याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोसायटीचा वॉचमन व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे.