दिल्ली दंगलींना पैसा पुरवल्याचा आरोप

नवी दिल्ली : दिल्लीत अलीकडेच झालेल्या दंगलींना पैसा पुरवल्याच्या, तसेच मनी लाँडरिंगच्या आरोपांखाली सक्तवसुली संचालनालयाने आम आदमी पक्षाचा (आप) निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन, इस्लामी संघटना पीएफआय आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलींदरम्यान गुप्तवार्ता विभागाच्या (आयबी) एका अधिकाऱ्याची हत्या केल्याबद्दल यापूर्वी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ताहिरविरुद्ध ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) हा गुन्हा नोंदवला असल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

अशाच प्रकारचे आरोप, पीएमएलएच्या एका स्वतंत्र प्रकरणात तपासाला सामोरे जाणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरुद्ध ठेवण्यात आले आहेत. हुसेन हा सध्या दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे.

पन्नासहून अधिक लोकांचे बळी घेणाऱ्या दिल्लीतील धार्मिक दंगलींसाठी कथित बेकायदेशीररीत्या पैसा पुरवल्याबाबत, तसेच मनी लाँडरिंगचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अनेक एफआयआरची सक्तवसुली संचालनालयाने दखल घेतली असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हुसेनच्या ३ साथीदारांना अटक

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या संबंधात ‘आप’चा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. या दंगलीत ५३ जण ठार, तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाले होते. दयालपूर येथील आबीद आणि नेहरू विहार येथील मोहम्मद शाहदाब व रशीद सैफी या दोघांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. २४ फेब्रुवारीच्या हिंसाचाराच्या वेळी हे दोघे हुसेनसोबत होते असे पोलिसांनी सांगितले. या दंगलींच्या संबंधात गुन्हे शाखेने सोमवारी हुसेनचा भाऊ शाह आलम याला अटक केली होती. आलमला आश्रय देणाऱ्या आणखी तिघांनाही अटक करण्यात आली होती. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारादरम्यान झालेल्या गुप्तवार्ता विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येच्या संबंधात न्यायालयात शरण येऊ देण्याची हुसेन याची विनंती न्यायालयाने अमान्य केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवडय़ात त्याला अटक केली होती.