या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात सीएएविरोधी आंदोलनांदरम्यान दिल्लीत मोठा हिंसाचार झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना ओमान आणि युएईवरुन जानेवारी महिन्यांत पैसा पुरवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र, हा पैसा फेब्रुवारीत झालेल्या दंगलीसाठी पुरवण्यात आला होती की सीएएविरोधातील आंदोलनासाठी याची चौकशी दिल्ली पोलीस करीत आहेत. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे.

पोलिसांना तपासादरम्यान या प्रकरणातील अटक आरोपी मीरन हैदर याच्या घरातून एक डायरी मिळाली आहे. हैदरला युएपीए (बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा) कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. मीरन हैदर (वय ३५) हा जामिया विद्यापीठातला पीएचडीचा विद्यार्थी आहे. दिल्ली दंगलप्रकरणी पोलिसांनी त्याला एप्रिलमध्ये अटक केली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना अडीच लाख रुपयांची रोकड आढळून आली. दरम्यान, पोलिसांचं म्हणणं आहे की, फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या दंगलीपूर्वी त्याच्या अकाऊंटवर ५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. हैदरच्या हस्तलिखित डायरीतून ही माहिती मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या डायरीतील लिखाणाच्या तपासणीसाठी ती ही डायरी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, या दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांनी खालिद सैफी या तरुणालाही ताब्यात घेतले असून तो इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकला मलेशियात भेटला होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने तयार केलेल्या अहवालानुसार, दिल्लीतील दंगलीसाठी कथितरित्या वापरण्यात आलेला पैसा सौदी अरेबिया आणि सिंगापूरमधील अनिवासी भारतीयांना मिळाला आहे. या अहवालानुसार, दिल्लीत फेब्रुवारीतील दंगलीपूर्वी १३ आणि १५ डिसेंबर २०१९ रोजी जामिया विद्यापीठ आणि न्यू फ्रेन्ड्स कॉलनीमध्ये हिंसाचार उफाळला होता.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात दिल्लीतील घटनेचे कट्टरपंथी इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएफआय) सोबतचे संबंध समोर आले आहेत. मार्चमध्ये ईडीने पीएफआयला आर्थिक गैरव्यवहार आणि दिल्लीतील हिंसाचारासाठी कथित अर्थसहाय्य पुरवल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.