दिल्लीमधील शाहीन बाग येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सीएएविरोधात (सुधारित नागरिकत्व कायदा) भाजपा सरकारचा विरोध करणारे शहजाद अली यांनी रविवारी (१६ ऑगस्ट २०२०) भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता आणि पक्षाचे नेते श्याम जाजू यांच्या उपस्थितीमध्ये अली यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. आमच्या समाजातील काही लोकांना भाजापा हा आमचा शत्रू वाटतो. त्याच लोकांचा समज किती चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे असं यावेळी अली यांनी स्पष्ट केलं.

सीएएसंदर्भातील सर्व समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी आपण एकत्र येऊन चर्चा करुयात असंही अली यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी सीएएवरुन भाजपा सरकारवर तिखट शब्दांमध्ये टीका करणाऱ्यांमध्ये अली यांचा समावेश होता. मात्र शाहीन बाग येथील आंदोलन संपल्यानंतरच अली यांची भूमिका हळूहळू बदलत गेली. मागील काही आठवड्यांमध्ये त्यांनी सोशल मिडियावर अनेकदा सरकारची बाजू घेणारी भूमिका मांडल्याचे दिसून आले. त्यांच्या पक्ष प्रवेशाचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

अली यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता दिल्ली भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या नवीन टीमची घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे. या नवीन पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये अली यांना स्थान मिळणार की नाही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. असं असलं तरी भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने अनेक नियुक्त्यांसंदर्भात विचार विनिमय अंतिम टप्प्यामध्ये असल्याचे सांगितले. तसेच पुढील आठवड्यामध्ये दिल्ली भाजपामधील या महत्वाच्या नियुक्त्यांसदर्भातील घोषणा केली जणार असल्याची शक्यता या नेत्याने व्यक्त केली. वेगवेगळ्या पदांसाठी काही नेत्यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालं आहे. दिल्ली भाजपाने संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने आरएसएसबरोबर एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला असून या आठवड्यामध्ये ही बैठक होणार आहे.