X

पहिलीतील मुलीवर स्वच्छतागृहात बलात्कार, नराधम अटकेत

खासगी शाळेतील धक्कादायक घटना

दिल्लीतील मालवीय नगर भागात असलेल्या एका खासगी शाळेत पहिलीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शाळेच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. पीडित मुलगी पहिल्या इयत्तेत शिकते. बुधवारी ही मुलगी स्वच्छतागृहात गेली असता तिथे तिच्यावर बलात्कार झाला. याबाबत या मुलीला सुरूवातीला काहीही समजले नाही. मुलीने जे काही सांगितले त्यानंतर तातडीने तिच्या आईने पोलिसात धाव घेतली.

पीडित मुलीने तिच्या वर्ग शिक्षिकेलाही या सगळ्या प्रकाराबाबत कल्पना दिली नाही. शाळा सुटल्यावर ती घरी आणि तेव्हा तिने आपल्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या गुप्तांगावर काही जखमा आहेत अशी माहितीही समोर आली. एवढेच नाही तर पीडित मुलीच्या आईने तिच्या शाळेतही हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर राकेश नावाच्या नराधमाला पोलिसांनी अटक केली. राकेश हा याच शाळेचा कर्मचारी असून १५ दिवसांपूर्वीच तो या शाळेत नोकरीला लागला आहे.

मला माझ्या पत्नीचा फोन आला त्यानंतर मी तातडीने शाळेत धाव घेतली. शाळेने त्या नराधमाला पोलिसांच्या स्वाधीन केले अशी माहिती पीडित मुलीच्या वडिलांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.शाळेच्या सपशेल दुर्लक्षामुळे माझ्या मुलीसोबत हा सगळा प्रकार झाला असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला. मुलींच्या स्वच्छतागृहात पुरूष कर्मचाऱ्याने प्रवेश केलाच कसा? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. मुलींच्या स्वच्छतागृहाबाहेर एक महिला कर्मचारी असते मात्र पीडित मुलीने जेव्हा स्वच्छतागृहात प्रवेश केला त्यावेळी ती तिथे नव्हती, ती पाणी प्यायला गेली होती अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिली. अटक केलेल्या नराधमाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • Tags: Six year old raped,
  • Outbrain