बिहारचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे घटकपक्ष असलेल्या जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागणीला पाठींबा दर्शवला आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा असे विधान त्यांनी एका सभेला संबोधित करताना केले आहे.

दिल्लीच्या बदरपूर येथे आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना बुधवारी त्यांनी संबोधित केले. यावेळी नितीशकुमार म्हणाले, “आमचा पक्ष कायमच दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीच्या बाजूने राहिला आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा त्याच प्रकारे तो दिल्लीलाही मिळायला हवा अशी आमची मागणी आहे.”

दिल्लीसाठी बिहारचे लोक इतकं मोठं काम करीत आहेत. मोठ्या संख्येने बिहारी लोक इथे राहतात जर त्यांनी एखाद्या दिवशी ठरवलं की आम्ही काम करणार नाही तर दिल्ली ठप्प होऊन जाईल. दिल्लीला अशा राज्याचा दर्जा मिळायला हवा जिथे सर्व गोष्टींचा अधिकार राज्य सरकारला असायला हवा. यामध्ये कायदा सुव्यवस्था, विकासाच्या योजना, नागरी सुविधांची कामं राज्याच्या अखत्यारित असायला हवी, असेही यावेळी नितीशकुमार म्हणाले.

देशाची राजधानी दिल्ली केंद्रशासीत प्रदेश आहे. मात्र, येथे इतर राज्यांप्रमाणे विधानसभा ही अस्तित्वात आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांप्रमाणे इथेही विधानसभा निवडणूका होऊन स्वतंत्र सरकार स्थापन होते. मात्र, बहुतेक महत्वाची खाती ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने इथल्या सरकारला महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा येतात. याच मुदद्यावरुन २०१५ मध्ये दैदिप्यमान यश मिळवून सत्तेत आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह आणि नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची आग्रही मागणी केली होती.

दिल्लीतील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणे कसे आवश्यक आहे, याबद्दलची आग्रही मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते.