दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने दारुच्या दुकानांबाहेरील लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी ऑनलाइन टोकन व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे आता दिल्लीतल्या मद्यप्रेमींना, तळीरामांना घरबसल्या दारुसाठी बूकिंग करता येणार आहे.

यासाठी दिल्ली सरकारने https://www.qtoken.in/ ही एक वेबसाइटची लिंक जारी केली आहे. या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर दारु खरेदीसाठी जवळचं दुकान निवडावं लागेल. त्यानंतर तारीख आणि वेळ सांगितली जाईल. त्यावेळेमध्ये संबंधित व्यक्ती रांगेमध्ये उभे न राहता दुकानामध्ये जाऊन दारु खरेदी करु शकेल. टोकन दुकानात दाखवताना एक सरकारी ओळखपत्रही दाखवावं लागेल. लॉकडाउनच्या नियमांचं पालन व्हावं आणि दुकानांवरील गर्दी कमी व्हावी यासाठी ही योजना आणल्याचं दिल्ली सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

यापूर्वी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने दारु विक्रीवर ‘विशेष करोना शुल्क’ही लावले आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता दारु एमआरपीपेक्षा 70 टक्के जास्त महाग मिळतेय. पण तरीही दारुच्या दुकानांबाहेरील गर्दी कमी होत नसल्याने आता सरकारने ऑनलाइन टोकन व्यवस्था सुरू केली आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने 4 मे पासून लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांसाठी आणखी वाढवला. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य आणि तंबाखूची दुकानं सुरु करण्यास परवानगी दिली. तसंच, रेड झोनमध्येही कन्टेंटन्मेंट क्षेत्र वगळता दारु विक्रीला परवानगी मिळाली. पण, दारुची दुकानं पुन्हा सुरु झाल्यानंतर मद्यप्रेमींची, तळीरामांची सर्वत्र दारु खरेदीसाठी एकच गर्दी होतानाचं चित्र समोर येत असून अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी जात आहेत.