संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे काम सुरु दिल्लीमध्ये सुरु झालं आहे. याच कारणामुळे संसदेच्या गेट क्रमांक एकवर असणारा महात्मा गांधीचा पुतळा तात्पुरत्या स्वरुपात मूळ जागेवरुन हटवण्यात आला आहे. हा पुतळा आता संसदेच्या गेट क्रमांक तीनजवळ हलवण्यात आला आहे. १६ फूट उंचीचा हा पितळ्यापासून तयार करण्यात आलेला पुतळा शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेला आहे. या पुतळ्याचे अनावरण १९९३ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.
समोर आलेल्या माहितीनुसार नवीन संसद भवानाच्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पुतळा पुन्हा होता त्या जागी बसवण्यात येणार आहे. राज्ससभेच्या सचिवालयातील एका अधिकाऱ्या दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी हा पुतळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला. जगातील सर्वात उंच शिल्प असणारा गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य आकाराचा पुतळा ज्या राम सुतार यांनी डिझाइन केलाय त्यांनीच हा संसदेच्या आवारातील गांधीचा मांडी घालून बसलेला पुतळा तयार केला आहे.
Delhi: Statue of Mahatma Gandhi at the Parliament House complex relocated near gate number 3 from gate number 1, due to the ongoing construction work of the new Parliament building pic.twitter.com/JlQN7Rm2XI
— ANI (@ANI) January 20, 2021
राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार १९८४ साली महात्मा गांधींचा मांडी घालून बसलेल्या अवस्थेतील शिल्प साकारण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या लोकनिर्माण विभागाने एक स्पर्धा आयोजित केली होती. त्याचवेळी हा पुतळा राम सुतार यांनी बनवला. सध्या संसद भवन परिसरामध्ये एकूण १६ शिल्प आहेत. यापैकी अनेक शिल्प ही राम सुतार यांनीच साकारली आहेत हे विशेष.
इंडियन एक्सप्रेसला अनिल सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हा लोकं संसदेच्या आवारातील हा गांधींचा पुतळा पाहतात तेव्हा ते आमच्याकडे पुतळ्यांची ऑर्डर देण्यासाठी येतात. माझ्या वडीलांनी संसद भवन परिसरातील अनेक शिल्प साकारली आहेत. यामध्ये सरदार वल्लभाई पटेल, भगत सिंग, छत्रपती शिवाजी महाराज, रणजीत सिंह, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरु यांच्यासहीत इतर काही शिल्पांचा समावेश आहे.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 2:36 pm