दिल्लीतील मुखर्जीनगरमधील सिंडिकेट बँकेच्या शाखेतील चोरीप्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तिघांना अटक केली आहे. त्यांनी बँकेतील २००० रुपयांच्या नोटांना हातही लावला नाही. केवळ लाखो रुपयांची नाणी घेऊन ते पसार झाले होते. नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटांमध्ये जीपीएस चीप बसवण्यात आल्याच्या अफवेमुळे त्यांनी नोटांऐवजी नाणी पळवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. नवीन नोटा चोरल्या तर आपण पकडले जाऊ शकतो असे त्यांना वाटले. त्यामुळे नाणी चोरी करण्याचे त्यांनी ठरवले होते. हे तिघेही दिल्लीच्या परिवहन विभागात काम करतात.

तिघेही आरोपी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांना चोरीच्या घटनेनंतर अवघ्या १२ तासांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांची पाच आणि दहा रुपयांची नाणी हस्तगत केली आहेत. त्यांनी ही नाणी ४६ पिशव्यांमधून नेली होती, अशी माहितीही त्यांनी चौकशीत दिली. चोरीच्या घटनांवर आधारित चित्रपट आणि मालिका पाहून त्यांनी बँकेत चोरी करण्याचा कट आखला होता. एका वर्कशॉपमधून कटर खरेदी केला होता. त्यांनी बँकेच्या कार्यालयाची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि नाणी पळवली. बँकेतील कर्मचारी सकाळी बँकेत आल्यानंतर बँकेत चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही चोरीची घटना कैद झाली होती. त्यात दोघांनी तोंडावर रुमाल बांधले होते. पण त्यातील एकाच्या हातावर टॅटू होता. बस डेपोच्या बाजूची खिडकी तोडलेली असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांकडे सुरुवातीला चौकशी केली. त्यावेळी एका तरुणाच्या हातावर टॅटू दिसला. यावरून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली.

[jwplayer fP09Fw8O-1o30kmL6]