दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमने मंगळवारी ६ संशयित दहशतवाद्यांना अटक करून दहशतवाद्यांच्या एका मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला. यापैकी दोन संशयित दहशतवादी ओसामा आणि जीशान कमर यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान, कथित दहशतवादी ओसामाचा काका हुमैद-उर-रहमान याने प्रयागराजच्या करेली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. ओसामाच्या काकाच्या आत्मसमर्पणानंतर त्याला दिल्लीला आणण्यासाठी पोलिसांची विशेष टीम लखनऊला गेली आहे.

याशिवाय दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमने मुंबई पोलिसांसोबत एक संयुक्त ऑपरेशन राबवले. यामध्ये अंडरवर्ल्ड टोळीतील जान मोहम्मद उर्फ ​​समीरला आयसिसशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून मुंबई पोलिसांनी झाकीर नावाच्या स्लीपर सेलला मुंबईतून ताब्यात घेतले आहे. सध्या दिल्ली पोलिसांची विशेष टीम आणि मुंबई पोलीस दोघेही झाकीरसोबत मुंबईत हजर असून झाकीरला लवकरच दिल्लीला नेले जाणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर आणि जान मोहम्मद उर्फ ​​समीर आयसिसच्या थेट संपर्कात होते आणि १९९३ च्या धर्तीवर भारतात मोठे स्फोट घडवण्याचा कट रचत होते. स्पेशल सेलने झाकीर आणि ओसामाचा काका हुमेद रेहमान यांना अधिकृतरीत्या अटक केली आहे. या मॉड्यूलशी संबंधित एकूण ८ लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानद्वारे चालवल्या जाणाऱ्या टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश करत पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेल्या दोन दहशतवाद्यांसह ६ जणांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वांना महाराष्ट्र, यूपी आणि दिल्ली येथून या अटक करण्यात आली आहे.