आग्य्राचा जगप्रसिद्ध ताजमहाल पाहायचा असेल तर दिल्लीहून तेथे रेल्वेने जाण्यासाठी सध्या दोन तास लागतात. मात्र हाच अवधी आता अध्र्या तासाने कमी होणार असून तुम्हाला केवळ ९० मिनिटांत आग्रा येथे जाण्याची सुविधा रेल्वे करून देणार आहे. त्यासाठीची चाचणी गुरुवारी यशस्वीरीत्या घेण्यात आली असून प्रवाशांसाठी ही सेवा येत्या नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
देशातील सर्वात वेगवान म्हणून ओळखली जाणारी ही गाडी ताशी १६० किलोमीटरच्या वेगाने धावेल. सध्या ‘दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस’ सर्वात वेगवान म्हणून ओळखली जाते. तिचा वेग १५० किलोमीटर प्रति तास आहे. दहा डब्यांच्या गाडीची चाचणी घेण्यात आली. ही गाडी सकाळी सव्वाअकरा वाजता दिल्लीहून निघून ९० मिनिटांनी आग्रा येथे पोहोचली. सदर गाडी नंतर निझामुद्दीन येथून सोडण्यात येणार असल्याचे दिल्ली विभागाचे विभागीय उपव्यवस्थापक अनुराग सचिन यांनी सांगितले. दिल्ली आग्रा मार्गावर १६ ठिकाणी वेगावर मर्यादा असून वेगात सुधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. आग्रा येथील ताजमहाल बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ही गाडी उपयुक्त ठरेल.
दिल्ली आग्रा मार्गानंतर दिल्ली-कानपूर व दिल्ली-चंदिगढदरम्यानही अशी वेगवान गाडी सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. याच धर्तीवर देशभरात अतिजलद रेल्वेसेवा सुरु करण्यात येतील.