टॅक्सीतच एका २७ वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिला घडल्या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकी देणारा उबेरचा टॅक्सीचालक शिवकुमार यादवला मंगळवारी दिल्ली न्यायालयाने दोषी ठरविले. येत्या २३ ऑक्टोबरला न्यायालय शिवकुमार यादवच्या शिक्षेची सुनावणी करेल. याप्रकरणी शिवकुमारला जन्मठेप होण्याची शक्यता आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यात दिल्ली न्यायालयात शिवकुमार यादवविरुद्ध कलम ३६६ आणि ३२३ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान शिवकुमार यादवने अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता.
डिसेंबर २०१४ मध्ये पीडित युवतीने हॉटेलमधून घरी जाण्यासाठी मोबाईल ऍपवरून उबेरकडून टॅक्सी मागविली होती. शिवकुमार यादव या टॅक्सीचा चालक होता. टॅक्सीने घरी जात असताना सदर तरूणीला ग्लानी आली, मात्र भानावर येताच टॅक्सी एका निर्जन स्थळी असल्याचे तिला आढळले. तिने मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवकुमारने तिला धमकी दिली आणि त्यानंतर टॅक्सीतच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर यादवने सदर युवतीला तिच्या घरी सोडले आणि झाल्या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती.