भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शहा आणि इराणी यांना शपथ दिली. विशेष म्हणजे इराणी यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.

 

शहा पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. तर इराणी यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यात भाजपचे उमेदवार शहा आणि इराणी यांनी विजय मिळवला. तर तिसऱ्या जागेवर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवला. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या दोन आमदारांची मते बाद ठरवल्यानंतर पटेल यांना विजयी घोषित केले. निवडणुकीत पराभूत झालेल्या बलवंतसिंह राजपूत यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर आक्षेप घेत गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी न्यायालयाने अमित शहा, स्मृती इराणी, अहमद पटेल यांच्यासह निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून २१ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

[jwplayer fP09Fw8O-1o30kmL6]