भाजपच्या ठाकूर यांची चर्चेची मागणी
दिल्ली विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या एका पुस्तकांत शहीद भगतसिंग यांचा उल्लेख ‘क्रांतिकारी दहशतवादी’ असा करण्यात आला असल्याची बाब भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी बुधवारी लोकसभेत निदर्शनास आणून दिली. देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जात आहे त्यावर चर्चा करण्याची मागणी ठाकूर यांनी केली.
‘इंडियाज स्ट्रगल फॉर इण्डिपेण्डन्स’ या इतिहारकार बिपीन चंद्र आणि मृदुला मुखर्जी लिखित पुस्तकांत अशा प्रकारचा संदर्भ देण्यात आला आहे, असे ठाकूर म्हणाले. इतकेच नव्हे तर काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख करिष्मा असलेले नेता असा केला आहे हा मोठा विनोद आहे. कारण लोकसभेत पक्षाला केवळ ४४ जागा मिळाल्या आहेत, असेही ते म्हणाले.
भगतसिंग यांच्या नातेवाईकांचा तीव्र आक्षेप
दिल्ली अभ्यासक्रमाच्या एका पुस्तकात शहीद भगतसिंग यांचा उल्लेख क्रांतिकारी दहशतवादी असा करण्यात आल्याने भगतसिंग यांच्या कुटुंबीयांनी हा प्रश्न दिल्ली विद्यापीठ आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे मांडण्याचे ठरविले आहे. याबाबत त्यांनी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पत्र पाठविले आहे.