सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सातवर पोहचली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक आमने-सामने आल्याने दिल्लीतील काही भागांमध्ये मंगळवारीही दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. एकीकडे दिल्लीच्या रस्त्यांवर सुरु असणारा हा वाद सोशल नेटवर्किंगवरही सुरु झाल्याचे दिसत आहे. मंगळवारी सकाळपासूनच ट्विटवर सीएए समर्थक आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले असून ट्विटवर हॅशटॅग वॉर सुरु झालं आहे. याच हॅशटॅग्समधील National Anthem या ट्रेण्डींग टॉपीकच्या माध्यमातून धक्कादायक व्हिडिओ समोर आला. आपचे प्रवक्ते सुधीर यादव यांनाही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीमध्ये रविवारपासून सुरु असलेल्या हिंसाचारावरुन देशाच्या राजधानीमध्ये केंद्रात सत्तेत असणारी भाजपा विरुद्ध राज्यात सत्तेत असणाऱ्या आप असा वाद सुरु झाला आहे. याच वादाची झकल सोशल नेटवर्किंगवरही पहायला मिळत आहे. भाजपा समर्थकांनी केजरीवाल यांचे जुने ट्विट्स व्हायरल करुन या हिंचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय करत आहेत असा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे आप समर्थकांनी दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर अत्याचार केला जात असल्याचा आरोप केला आहे. याचसंदर्भातील अनेक हॅशटॅग आणि टॉपिक ट्रेण्ड होताना दिसत असून. National Anthem हा टॉपिक ट्रेण्डींग ट्रेण्ड होत आहे.

National Anthem या ट्रेण्डींग टॉपिकसंदर्भात सुधीर यांनी एक व्हायर व्हिडिओ ट्विट करत दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे. “राष्ट्रगीत यापुढे आधीसारखे वाटणार नाही,” अशी कॅप्शन यादव यांनी व्हिडिओला दिली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यादव यांनी अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशापद्धतीचा हॅशटॅगही ट्विटमध्ये वापरला आहे.

सुधीर यादव यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये काय आहे?

यादव यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये काही युवक जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसत आहे. या युवकांना दिल्ली पोलिसांचे जवान राष्ट्रगीत गाण्यास सांगत असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. व्हिडिओमध्ये काही पोलीस या तरुणांचा व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत तर काही पोलीस लाठ्यांनी या जखमी तरुणांना मारहाण करत राष्ट्रगीत गाण्याची सक्ती करताना दिसत आहेत.

मात्र या व्हिडिओसंदर्भात दिल्ली पोलिसांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. तसेच या व्हिडिओतील तरुण कोण आहेत?, त्यांचे पुढे काय झालं? यासारखे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. दरम्यान हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बैठक झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi violence aap spokesperson sudhir yadav says delhi police made injured protester sing national anthem scsg
First published on: 25-02-2020 at 14:18 IST