फेब्रुवारी महिन्यात दिल्ली उसळलेली दंगल व आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. यात अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन, हलील सलमान, समीर यांच्यासह दहा जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी टीका केली आहे. तसंच “ताहिर हुसैन यांना फक्त मुस्लीम असल्याची शिक्षा मिळत आहे,” असं खान यांनी म्हटलं आहे.

२५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत चाँद बाग परिसरात आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी ६५० पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे. यात ९६ साक्षीदारांचं जबाब नोंदवण्यात आले आहेत. हत्या, दंगलीचा कट, जाळपोळ यासह अनेक कलमान्वये आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांनाही आरोपी करण्यात आलं असून, त्यावर अमानतुल्लाह खान यांनी टीका केली आहे.

“दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात दिल्लीत झालेल्या दंगलीचा प्रमुख सूत्रधार ठरवलं आहे. दुसरीकडे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दंगल कुणी केली. दंगल करणाऱ्यांची दिल्ली पोलिसांनी अजूनही चौकशी केलेली नाही. मला वाटत ताहिर हुसैनला फक्त मुस्लीम असल्याची शिक्षा मिळाली आहे,” असं अमानतुल्लाह खान यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

अंकित शर्मा या कर्मचाऱ्याची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात अंकित शर्मा यांच्या अंगावर ५१ जखमा आढळून आल्या होत्या. अंकित शर्मा हत्येप्रकरणी हलील सलमान मुख्य आरोपी आहे. त्याच्या मोबाईलमधील कॉल महत्त्वाचा पुरावा असल्याचं म्हटलं आहे.