पूर्व दिल्लीतील दोन भागांमध्ये पुन्हा हिंसाचार झाला आहे. मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांनी लष्कराला पाचारण करण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्काराला बोलवा, तरच लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. कारण पूर्ण प्रयत्न करुनही दिल्ली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाहीय असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

“आता लष्कराला बोलावण्याची वेळ आली असून, हिंसाचारग्रस्त भागांमध्ये संचारबंदी लागू करण्याची आवश्यकता आहे” असे टि्वट केजरीवाल यांनी केले आहे. गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून त्यांच्याकडे सुद्धा लष्काराला बोलावण्याची मागणी करणार आहोत असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा – दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा पोहचला २० वर

सुधारित नागरिकत्व कायदा समर्थक आणि विरोधकांमधील संघर्षातून झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित राज्याच्या नागरी प्रशासनाच्या विनंतीवरुनच लष्काराला पाचारण करण्यात येते. दिल्ली केंद्रशासित प्रदेश असून कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राच्या गृहखात्याकडे आहे.