दिल्लीतील हिंसाचार, सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाचे पडसाद

दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र, राज्य सरकार आणि पोलिसांना नोटीस

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांविरुद्ध द्वेषमूलक भाषण केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवावा, अशी मागणी करण्यात आलेल्या याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि पोलिसांना म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरिशंकर यांच्या पीठाने केंद्रीय गृहमंत्रालय, दिल्ली सरकार आणि पोलिसांवर नोटिसा बजावल्या आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आपचे आमदार अमानतुल्लाह खान, एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी आणि एआयएमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या सर्व नेत्यांनी केलेल्या कथित द्वेषमूलक भाषणाची पडताळणी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची मागणी ‘लॉयर्स व्हॉइस’ने केली आहे.

अन्य एका याचिकेत भाजपच्या तीन नेत्यांनी केलेल्या कथित द्वेषमूलक भाषणप्रकरणी दोन स्वतंत्र अर्ज करण्यात आले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रेडिओ जॉकी सायेमा यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

हिंदू सेनेच्या विष्णू गुप्ता यांनी केलेल्या याचिकेत एआयएमआयएम नेत्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे दिल्लीत जातीय तणाव निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर संजीवकुमार यांनी केलेल्या एका अर्जामध्ये दिल्लीतील जातीय हिंसाचाराची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी ३० एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

‘एनआयए’ चौकशीसाठी जनहित याचिका

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकाची यूएपीए कायद्यान्वये राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार आणि आप सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरि शंकर यांच्या पीठाने गृहमंत्रालय, दिल्ली सरकार आणि पोलीस यांच्यावर नोटिसा बजावल्या असून त्यांना भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद, एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी आणि वारिस पठाण यांच्यासह सीएएविरोधात नागरिकांना चिथावणी देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दिल्लीतील आंदोलनामागे देशविरोधी शक्ती कोण आहेत ते एनआयएने शोधावे आणि पीपल्स फ्रण्ट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत, असे अजय गौतम यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे.