X
X

दिल्ली हिंसाचार : आप नेत्याच्या घरावर सापडले पेट्रोल बॉम्ब, दगडांचा खच

READ IN APP

आम आदमी पार्टी ताहिर यांच्या बचावासाठी पुढे आली आहे.

ईशान्य दिल्लीतील खजुरी येथे हिंसाचार भडकावण्यामध्ये आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. कारण त्यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, गलोल आणि एका ट्रेमध्ये मोठे दगड आढळून आले आहेत. यापूर्वी याच घराचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यामध्ये या घरावरुन सातत्याने दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकले जात होते. गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी त्यांच्या कुटुंबाने या घरावर असलेल्या लोकांनाच जबाबदार धरले आहे. मात्र, आपचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी आता ताहिर यांच्या बचावासाठी पुढे आली असून याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

छतावर सापडले दगड आणि पेट्रोल बॉम्ब

आता दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जेव्हा काही माध्यमांचे प्रतिनिधी या घरावर गेले तेव्हा त्यांना तिथे या सर्व गोष्टी आढळून आल्या. यामध्ये दगड आणि काही दगडांचा भुगाही होता. जसे विटा फोडून त्याचे छोटे तुकडे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर तेथे एक मोठी गुलोलही पडलेली होती. पेट्रोल भरुन त्यावर कपडा लावलेल्या कोल्डड्रिंकच्या बाटल्याही इथे आढळून आल्या आहेत. याचा वापर बॉम्बसारखा वापर करण्यात येत होता. त्याचबरोबर काही गावठी कट्टे आणि पोतेही मिळाले आहेत. ज्यामध्ये काही दगड आढळून आले आहेत.
ताहिर यांनी नाकारले आरोप

याप्रकरणी ताहिर यांनी आजवर स्वतःला निर्दोष म्हटले आहे. त्यांचं म्हणणं आहे की हिंसाचारावेळी ते घरामध्ये उपस्थित नव्हते. पोलिसांनी त्यांना सुरुवातीलाच तिथून बाहेर काढलं होतं. त्यांनी म्हटलं, माझ्या घरावरुन कोण बॉम्ब फेकत होते याची मला माहिती नाही. समोरच्या घऱावरुन आपल्या घराच्या दिशेने बॉम्ब फेकण्यात येत होते, असा दावाही त्यांनी केला आहे.

ताहिर यांच्या बचावासाठी पुढे आली आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी आपल्या नगरसेवकाच्या बचावासाठी पुढे आली आहे. आपने दिल्ली पोलिसांवर आरोप करताना म्हटलं की, पोलीस ताहिर यांच्या घरावर आठ तासांनंतर पोहोचली. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. आपचे नेते संजय सिंह म्हणाले, ताहिर हुसैन यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या घरामध्ये जमाव घुसला होता त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांकडे मदतही मागितली होती. त्यानंतर पोलीस तिथे आठ तासांनंतर पोहोचले आणि त्यांनी त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर दोन दिवसांपासून ते आपल्या घरीच नव्हते.

22

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on: February 27, 2020 1:13 pm
Just Now!
X