निवडणुकीत मतदान केल्यानंतर बोटावर शाईची खूण असल्याच्या छायाचित्रांनी फेसबुक, ट्विटर आदी सोशल नेटवर्किंग साइट भरून गेल्या असून त्यामध्ये मुरब्बी राजकारण्यांबरोबरच दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजाविणाऱ्यांचा समावेश आहे. तरुण मतदारांनी विशेषत: प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांनी अशी छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करताना आनंद वाटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. गडद जांभळ्या रंगाची शाई बोटावर लावलेले चित्र हा मतदान केल्याचा पुरावा आहे, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.आपण मतदानाचा हक्क बजावला आणि देशासाठी काही तरी केले, अशी भावना निर्माण झाल्याने आपण सोशल नेटवर्किंगवर छायाचित्र अपलोड केले, असे प्रथमच मतदानाचा हक्क बजाविणाऱ्या मनीषा गर्ग यांनी सांगितले. मतदान केंद्रांवर आमची उपस्थिती होती हे दर्शविण्यासाठी आपण फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्किंगचा वापर केल्याचे अनेकांनी सांगितले. आपला देश स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त व्हावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग होता आणि ती अभिमानास्पद बाब असल्याचे आपले मत असल्याने बोटाला शाई लावलेले छायाचित्र अपलोड केले, असे मायांक कश्यप या तरुण मतदाराने स्पष्ट केले. अशा प्रकारची छायाचित्रे अपलोड केल्यामुळे अनेकांना मतदान करण्याची प्रेरणा मिळेल, असेही काही मतदारांनी सांगितले.
‘नोटा’ला अनेकांची पसंती
नवी दिल्ली:‘वरीलपैकी कोणीही नाही’ (नोटा) या मतदान यंत्रावरील नव्या पर्यायाला अनेक दिल्लीकर मतदारांनी पसंती दिल्याचे बुधवारच्या मतदानानंतर आढळून आले आहे. दिल्लीतील अनेक भागांतील मतदारांनी नोटापुढील कळ दाबल्याचे सांगितले. आमच्या भागातील समस्या पाच वर्षांपूर्वी होत्या तशाच आजही आहेत. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील कोणत्याही उमेदवारावर आमचा विश्वास उरलेला नाही, म्हणूनच आम्ही ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला असे पश्चिम दिल्लीतील विकासपुरी वसाहतीतील अरविंद त्यागी या मतदाराने सांगितले. तर एका मतदाराने नाव न छापण्याच्या अटीवर यापूर्वीच निवडणूक आयोगाने हा पर्याय मतदानयंत्रावर उपलब्ध करून द्यायला हवा होता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.