भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला लवकरच वॉशिंग्टन डीसीप्रमाणे सुरक्षा कवच मिळणार आहे. अमेरिकाच हे सुरक्षा कवच आपल्या देशाला उपलब्ध करून देणार आहे. केंद्र सरकारतर्फे लवकरच ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा उपयोग दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत भारताचे संबंध सध्या तणावाचे आहेत, चीनने तर वारंवार युद्धाची धमकी दिली आहे आणि पाकिस्तान दहशतवादी कारवाया करण्यात आघाडीवर आहे. अशात राजधानी दिल्लीला एका सबळ हवाई सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊनच ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा वापर दिल्लीच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे.

‘आजतक’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यावर क्रूझ मिसाईल, ड्रोन किंवा एअरक्राफ्टद्वारे हल्ला झाला तर यापैकी कोणत्याही हल्ल्यापासून संरक्षण व्हावं ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा वापर करण्यात येणार आहे. ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ ही सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याबाबत सध्या केंद्रात चर्चा सुरू आहे अशीही माहिती समोर आली आहे.

अमेरिकेच्या नास्मस या कंपनीने भारतीय वायुदल आणि इतर सरकारी एजन्सींना या यंत्रणेचं प्रेझेंटेशन दिलं आहे.
अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसी या शहराच्या सुरक्षेची जबाबदारीही २००५ पासून नास्मस या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. फक्त अमेरिकाच नाही तर स्पेन, नेदरलँड, नॉर्वे आणि फिनलँड या देशांच्या सुरक्षेतही नास्मस या कंपनीचं मोठं योगदान आहे.

शत्रू राष्ट्राने एअरक्राफ्ट, ड्रोन किंवा मिसाईल यांच्या मार्फत हल्ला करण्याआधीच नास्मस कंपनीची यंत्रणा त्याचे अस्तित्त्व हवेतच संपवून टाकते. त्याचमुळे नास्मस ही कंपनी ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ या प्रकारची सुरक्षा यंत्रणा पुरवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

मुंबईलाही सुरक्षा?

‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल’ चा हा प्रयोग भारतीय स्वदेशी बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स शिल्डच्या प्रकल्पासोबत होणार आहे. स्वदेशी बनावटीच्या बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स शिल्डच्या प्रकल्पाच्या अंतर्गत दिल्लीला सुरक्षा पुरविली जाणार आहे. तसेच मुंबईलाही ही सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता आहे, अशीही माहिती समोर येते आहे.