करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. गेल्या महिनाभरापासून लोकांना घरातच राहावं लागत आहे. काही महत्त्वाचं आणि अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडावं लागत आहे. लॉकडाउनची कडक अमलबजावणी सुरू असताना एका गर्भवती महिलेच्या मदतीसाठी पोलीस धावून आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच महिलेनं एका गोडस मुलाला पोलिसांच्या गाडीत जन्म दिला. राजधानी दिल्लीत ही घटना घडली आहे.

पश्चिम दिल्लीचे डीसीपी दीपक पुरोहित यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना या घटनेची माहिती दिली. डीसीपी पुरोहित म्हणाले, ‘पश्चिम दिल्लीतील ख्याला परिसरात मिनी कुमार हे आपल्या कुटुंबासह राहतात. मिनी कुमार गुरूवारी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे मदतीची विनंती केली. या कुटुंबानं रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती कॉन्स्टेबलकडे केली. महिला पोलीस कर्मचाऱ्यानं याविषयी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या व्हॅनमधून महिलेला रूग्णालयात पाठवण्यात आलं. पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच महिलेची गाडीत प्रसूती झाली. गुरूवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली,’ अशी माहिती पुरोहित यांनी दिली.

‘गाडी रुग्णालयापासून फार तर एक किमी अंतरावर असताना प्रसूती झाली आणि महिलेनं एका मुलाला जन्म दिला. महिलेच्या पतीनं आणि तिच्या बहिणीनं ही प्रसूती केली. यावेळी महिला कॉन्स्टेबलनेही मदत केली. त्यानंतर डॉक्टरांना तेथे बोलवण्यात आलं. डॉक्टर सर्व साहित्य घेऊन जिप्सीच्या ठिकाणी आले. त्यानंतर महिलेला आणि बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आई व बालकाची प्रकृती आता उत्तम आहे,’ असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.