नवऱ्याच्या आणि तिच्या वयामध्ये बरच अंतर होतं. नवरा तिच्यापेक्षा २० वर्षाने मोठा होता. लग्नाच्यावेळी त्याने त्याचं खरं वय लपवलं होतं. त्यामुळे चिडलेल्या महिलेने तिच्या दोन प्रियकरांच्या मदतीने नवऱ्याला संपवलं. आधी तिने आत्महत्या आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला पण नंतर ती हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
प्रियंका असे आरोपी महिलेचे नाव असून तिनेच पती कृष्णा त्यागीच्या (५०) हत्येचा कट रचल्याचे चौकशीतून समोर आले आहे. नैराश्यामुळे नवऱ्याने आत्महत्या केली, असे प्रियंकाने दाखवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी आधी ओढणीने गळा आवळून कृष्णा त्यागीची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या आहे, असे भासवण्यासाठी त्याचा मृतदेह पंख्याला लटकवला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
अंत्यविधीच्यावेळी तिच्या संशयास्पद व्यवहारावरुन या सर्व कटाचा उलगडा झाला. १८ ऑगस्टला कृष्णा त्यागीला सरकारी रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित केले. त्यागी कुटुंबीय तिथे पोहोचल्यानंतर प्रियंकाने आदल्यारात्री अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तो आजारी होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे नातेवाईकांना सांगितले. डॉक्टरांना मृतदेहाच्या गळयाजवळ काही व्रण दिसले. त्यावेळी प्रियंकाने तिथे रडण्यास सुरुवात केली व स्वत:हून त्याने जीवन संपवले असे सांगितले.
त्या दरम्यान त्यागी कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्राथमिक चौकशीमध्ये रोहिणी येथील प्रियंकाच्या घरात करण नावाचा एक माणूस राहत असल्याचे समजले. ती सर्वांना नातेवाईक म्हणून करणची ओळख करुन द्यायची. पण कृष्णा त्यागीच्या मृत्यूनंतर करण गायब होता. पोलिसांना प्रियंकाच्या वर्तनावर संशय आला. त्यांनी खोदून खोदून चौकशी सुरु केल्यानंतर तिने करण आणि त्याचा मोठा भाऊ वीरु बर्माच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली असे रोहिणीचे डिसीपी पी.के.मिश्रा यांनी सांगितले.
प्रियंकाच्या बहिणीने तिची वीरु बरोबर ओळख करुन दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. काही वर्षानंतर तिची वीरुचा भाऊ करण बरोबर ओळख झाली. त्याच्याबरोबरही तिचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. पोलिसांनी तिघांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला असून वीरुचा शोध सुरु आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2020 3:57 pm