दिल्लीतील एयरोसिटी परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थापकानेच एका कर्मचारी महिलेची साडी सोडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पवन दहिया असे या व्यवस्थापकाचे नाव आहे. कर्मचारी महिलेच्या साडीचा पदर खेचत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. या प्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली आहे, पण १७ दिवस उलटूनही पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. दरम्यान, दहियावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने दिली आहे.

 

हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थापक पवन दहिया याने छेड काढली, तसेच त्याच्या कारमध्ये कोंबून अपहरण करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, तिने हॉटेलच्या एचआरकडेही याप्रकरणी तक्रार केली होती. पण हॉटेल व्यवस्थापनाने व्यवस्थापकाविरोधात कारवाई करण्याऐवजी तिलाच कामावरून काढले आहे. अखेर तिने पोलिसांकडे तक्रार केली. पण अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, महिलेने केलेल्या तक्रारीनंतर संबंधिताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे हॉटेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. व्यवस्थापक अनेक दिवसांपासून छेड काढत असल्याचे तिचे म्हणणे आहे. अखेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाल्यानंतर या छळाविरोधात आवाज उठवला, असे तिने सांगितले. दरम्यान, हॉटेल व्यवस्थापनाने व्यवस्थापक दहियाविरोधात कारवाई केली आहे. त्याला निलंबित करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.