दिल्लीत टाळेबंदी शिथिल करण्याची गरज आहे का, असेल तर ती कशी करावी, शहरातील मेट्रो रेल्वे सुरू करावी का, शाळा-महाविद्यालयांची सुट्टी वाढवावी की, शालेय वर्ष नियमितपणे चालू केले जावे, बाजारपेठा खुल्या कराव्यात का, अशा टाळेबंदीसंदर्भातील अनेक मुद्दय़ांवर सूचना करा, असे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीकरांना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सहा तास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी टाळेबंदीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. या चर्चेच्या अखेरीस मोदी यांनी शाळा-महाविद्यालयांपासून बाजारपेठा आणि मजुरांच्या प्रश्नापर्यंत अनेक समस्यांवर राज्यांनी १५ मेपर्यंत लेखी सूचना पाठवण्याची विनंती केली. मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत केजरीवाल यांनी दिल्लीकर जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. अशा पद्धतीने लोकांची मते जाणून घेऊन टाळेबंदीवर धोरण निश्चितीचा विचार करणारे केजरीवाल हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्य सरकारकडे सूचना पाठवण्यास सांगितले असून त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.

टाळेबंदीचा कालावधी १७ मे रोजी संपत असून दिल्लीतील सर्वच्या सर्व म्हणजे ११ जिल्हे लाल श्रेणीत आहेत. त्यामुळे दिल्लीत कोणत्याही आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्यात आलेली नाही. अन्य राज्यांप्रमाणे दिल्लीतही टाळेबंदी शिथिल करण्याची गरज असून नियंत्रित विभाग वगळता दिल्लीच्या अन्य भागांमध्ये थोडय़ाफार प्रमाणात विविध व्यवहारांना मुभा दिली पाहिजे, असे मत केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या बैठकीत मांडले. दिल्लीकरांसाठी बस व मेट्रो सेवा तसेच खासगी टॅक्सी सेवा कधी होणार हा प्रमुख प्रश्नांपैकी एक आहे. मात्र या सेवा सुरू करण्यासाठी मास्क वापरण्याची सक्ती व शारीरिक अंतर राखण्याचे बंधन घालावे लागणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. दारूच्या दुकानासमोर झुंबड उडाल्यानंतर ती बंद करण्याची वेळ दिल्ली सरकारवर ओढवली होती. याशिवाय, दिल्लीतील मॉलमधील दुकानांचे काय करायचे हादेखील महत्त्वाचा मुद्दा असेल. त्याअनुषंगाने केजरीवाल यांनी लोकांकडून शिफारशी मागितल्या आहेत. त्यातील महत्त्वाच्या शिफारशींचा आढावा घेऊन दिल्ली सरकार केंद्राला सूचनापत्र पाठवणार आहे.