भारतामध्ये अनेकजण अपघातानंतर केवळ बघ्यांची भूमिका घेताना दिसतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच एक नवी योजना अंमलात आणणार आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहचवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून दोन हजार रुपये देण्यात येतील. अशाप्रकारे बक्षिस दिल्याने तरी एखाद्या अपघातानंतर जखमींना तातडीने रूग्णालयात पोहोचवण्यासाठी लोक पुढाकार घेतील असे सरकारी अधिकाऱ्यांना वाटते.

या योजनेमुळे अपघात आणि इलाज करण्यादम्यानचा वेळ कमी होईल आणि अपघातग्रस्तांचा जीव वाचू शकेल, अशी अपेक्षा दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंद्र जैन यांनी व्यक्त केली. रोख रक्कमेबरोबरच मदत करणाऱ्या व्यक्तीला एक प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. जानेवारी माहिन्यापासून दिल्ली सरकारने गुड स्मार्टियन पॉलिसी नावाने एक योजना सुरु केली होती. या अंतर्गत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना केवळ प्रशस्तिपत्रक देण्यात येत होते. मात्र, आता या मदतीसाठी रोख मोबदला मिळणार असल्याने दिल्लीकर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावतील, अशी आशा अधिकाऱ्यांना आहे.