गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या नरोडा पाटिया दंगलप्रकरणातून निर्देष सुटल्यानंतर गुजराच्या माजी मंत्री माया कोडनानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उशीरा का होईना पण न्यायाचा विजय झाला, असे त्या म्हणाल्या. तब्बल एक दशकानंतर आलेल्या निकालानंतर कोडनानी यांची मुक्तता झाली आहे. दंगलीमध्ये जमावाकडून ९७ लोकांची हत्या करण्यात आली होती. या दंगलीत सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर होता.


कोडनानी म्हणाल्या, न्याय मिळाल्याने मी खुश आहे. देवाच्या घरी उशीर झाला तरी न्याय मिळतोच. मला माहिती होते की मी निर्दोष असून मला न्याय जरूर मिळेल. दरम्यान, शनिवारी कोर्टाकडून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कोडनानी म्हणाल्या होत्या, मी अद्याप सक्रिय राजकारणात परतण्याबाबत विचार केलेला नाही. मात्र, भाजपाची कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने माया कोडनानी यांना २००८ मध्ये नरोडा पाटिया आणि नरोडा गावात झालेल्या ९७ लोकांच्या हत्येप्रकरणी आरोपी केले होते. ऑगस्ट २०१२ मध्ये एसआयटीच्या विशेष कोर्टाने कोडनानींचा या कटात सहभाग असल्याबद्दल २८ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २००९ पासून त्या तुरुंगवास भोगत होत्या त्यानंतर जुलै २०१४ मध्ये त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्या अद्याप तुरुंगाबाहेर होत्या.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने कोडनानी यांच्यासमवेत १७ लोकांना मुक्त केले होते. होयकोर्टाने निकाल देताना म्हटले की, माया कोडनानी या दंगलीवेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे सिद्ध झालेले नाही. मात्र, बजरंग दलाचा माजी नेता बाबू बजरंगी याला दोषी ठरवत उच्च न्यायालयाने २१ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तत्पूर्वी कनिष्ठ न्यायालयाने बजरंगीला मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे हायकोर्टाच्या निकालामुळे बजरंगीलाही काहीसा दिलासा मिळाला आहे.