News Flash

Delta Plus Variant : “तातडीने पावलं उचला”, केंद्राचा महाराष्ट्रासह ३ राज्यांना इशारा!

Delta Plus Variant विषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना तातडीने पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

Delta Plus : महाराष्ट्रासह तीन राज्यांना केंद्र सरकारचा सतर्कतेचा इशारा!

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरू लागलेला असताना दुसरीकडे देशात म्युकरमायकोसिसपाठोपाठ Delta Plus या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. सध्या विषाणूच्या या प्रकाराचे देशात फारसे रुग्ण जरी नसले, तरी त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहाता केंद्र सरकारने देशातील तीन राज्यांना तातडीने पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा समावेश आहे. या तीनही राज्यांमध्ये करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले असून त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्राने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध किंवा तत्सम पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाने या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केलं आहे.

देशातील २२ पैकी १६ रुग्ण महाराष्ट्रात

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा डेल्टा व्हेरिएंट भारतासह जगातल्या एकूण ८० देशांमध्ये सापडला आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. भारतात डेल्टा प्लसचे एकूण २२ रुग्ण सापडले आहेत. मात्र, या २२ पैकी १६ रुग्ण महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत. त्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत. दरम्यान, केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १६ रुग्ण असले, तरी राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात २१ डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत.

 

देशातील ६ जिल्ह्यांमध्ये Delta Plus चा प्रसार!

Delta Plus Variant विषयी आढावा घेणाऱ्या INSACOG (Indian SARS-CoV-2 Genomic Consortia) या गटाच्या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेल्टा प्लस व्हेरिएंटविषयी महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव, केरळमधील पलक्कड आणि पथ्थनमथित्ता, मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्ये करोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे.

 

लक्षपूर्वक आणि कार्यक्षमतेनं काम करा

यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तीनही राज्यांना सल्ला दिला आहे की स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाने या व्हेरिएंटविषयी अधिक लक्षपूर्वक आणि कार्यक्षमपणे काम करणं आवश्यक आहे. आधीपासूनच या यंत्रणा व्यापक अर्थाने त्या पातळीवर काम करत असल्या, तरी डेल्टा प्लसबाबत अधित सतर्क राहण्याची गरज आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केली आहे.

 

“करोनाच्या आधीच्या व्हेरिएंटमुळे ऑक्सिजन पातळी कमी व्हायची, पण डेल्टा प्लसमुळे…!”

दरम्यान, “ज्या ठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन, गर्दी कमी करणे आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी करणे, व्यापक प्रमाणावर चाचण्या करणे, ट्रेसिंग वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकृत करणे अशा उपाययोजनांसंदर्भात राज्य सरकारांनी तातडीने पावलं उचलावीत”, असे निर्देश केंद्राकडून या तीन राज्यांना देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आकडेवारी जाहीर केल्यानंतर आलेल्या ताज्या अहवालांनुसार डेल्टा प्लस’चे रुग्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ या तीन राज्यांसोबतच पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, जम्मू आणि कर्नाटकात देखील आढळले आहेत. त्यांची एकूण आकडेवारी ४० च्या घरात जात असल्याचं एका अहवालावरून स्पष्ट होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 8:06 pm

Web Title: delta plus variant in marathi central health ministry warns maharashtra keral madhya pradesh pmw 88
Next Stories
1 शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक संपली; काय झालं बैठकीत, माजिद मेमन म्हणतात..
2 Gujarat Liquor Prohibition: उद्या सांगतील मांसाहारास बंदी, दारुबंदीवरून गुजरात हायकोर्टात युक्तिवाद सुरू
3 भिंतीला भगदाड पाडून बँक लुटणारा अटकेत; ३ महिन्यांपूर्वी आखली होती योजना