करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील करोना रुग्णांची संख्या २० कोटी पार करेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक करोना अपडेटमध्ये म्हटलंय. जागतिक स्तरावर १३२ देशांमध्ये बीटा व्हेरिएंट आणि ८१ देशांमध्ये गामा व्हेरिएंटची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर, अल्फा व्हेरिएंट १८२ देशांमध्ये पसरला आहे. दरम्यान, २६ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ४० लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असेही अपडेटमध्ये म्हटले आहे.

जागतिक पातळीवर नोंदवल्या गेलेल्या प्रकरणांची एकत्रित संख्या आता जवळपास १९.७ कोटी झाली असून एकूण मृतांची संख्या ४२ लाख झाली आहे. रुग्णांची संख्या याच गतीने वाढत राहिली तर पुढच्या आठवड्यात रुग्णसंख्या २० कोटींचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.गेल्या आठवड्यात सर्वात जास्त ५ लाख ४३ हजार ४२० रुग्ण अमेरिकेत आढळले असून त्यापाठोपाठ २ लाख ८३ हजार ९२३ रुग्ण भारतात आढळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया, नंतर ब्राझील आणि इराण आहेत. तर, गेल्या आठवड्यात सर्वाधिक मृत्यू १२ हजार ४४४ इंडोनेशियात झाले असून त्यापाठोपाठ भारतात ३ हजार ८०० मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे.

जगभरात डेल्टा व्हेरिएंटचा वाढता प्रसार आणि लस असमानता पाहता डब्ल्यूएचओने सप्टेंबरच्या महिन्यापर्यंत करोना लसीच्या बूस्टर शॉट्सवर स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.  डब्ल्यूएचओचे अध्यक्ष टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, “लसीच्या पुरवठ्याचा अभाव आहे. जिथं जास्त उत्पन्न असलेल्या देशांनी प्रत्येकी १०० लोकांसाठी लसीचे १०० डोस दिले आहेत, तिथं कमी उत्पन्न असलेले देश प्रत्येकी १०० लोकांसाठी केवळ १.५ डोस देऊ शकले आहेत. विकसित देशांना लसीचा पुरवठा जास्त होत असल्याने अविकसित देशांना लसी मिळत नाही. जगभरात आतापर्यंत चार अब्जांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. पण अद्यापही अनेक नागरिकांना लसीचा पहिला डोस देखील मिळालेला नाही. तोच काही देश बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहेत,” असंही गेब्रेयसस म्हणाले.