नवी दिल्ली : अयोध्या वादात सर्वोच्च न्यायालयात मुस्लीम पक्षांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी बुधवारी भर न्यायालयात भगवान श्रीरामाचे जन्मस्थान दाखवणारा चित्रमय नकाशा फाडून टाकण्याचे जे ‘अत्यंत अनैतिक कृत्य’ केले, त्याबद्दल बार कौन्सिलने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या प्रकरणातील एका हिंदू पक्षाने केली आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणात सुनावणीच्या चाळिसाव्या, म्हणजे अखेरच्या दिवशी धवन यांनी केलेल्या या कृतीचा निषेध करणारे पत्र अखिल भारतीय हिंदू महासभेच्या एका गटाने बार कौन्सिल ऑफ इंडियाला लिहिले आहे.

हिंदू महासभेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी पुरवलेला रामजन्मस्थानाचा नकाशा भरगच्च न्यायालयात फाडून टाकून धवन यांनी बुधवारी खळबळ माजवली होती.

सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या नकाशाच्या प्रतीचे तुकडेतुकडे करून ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी अतिशय अनैतिक कृत्य केले आहे.

धवन यांच्या या कृत्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेची अप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळे या प्रकाराची दखल घेऊन, धवन यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी एका निवेदनात सांगितले.