रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना हंगामी जामीन मंजूर करताना, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयावर गोस्वामी यांना जामीन न दिल्याबद्दल ताशेरे ओढले. न्या. चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सकाळी ११ ते दुपारी साडेचार अशी साडेपाच तास सलग सुनावणी घेतली. या सुनावणीनंतर अर्णब यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र याच संदर्भात ट्विट करताना स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने न्या. चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयासंदर्भात नाराजी व्यक्त करताना काही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. याच प्रकरणात आता पुण्यातील दोन वकिलांनी थेट भारताच्या अ‍ॅटर्नी जनरलकडे यासंदर्भात तक्रार केली असून संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कुणालवर कारवाई करण्याची मागणी या वकिलांनी केली आहे.

न्यायदान करणारी घटनात्मक संस्था म्हणून आपण (न्यायालय) कायद्याची अंमलबजावणी केली नाही, नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण केले नाही तर कोण करणार, अशी परखड टिप्पणी सर्वोच्च न्यायालयातील न्या. धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान केली. राज्य सरकारांनी व्यक्तींना लक्ष्य केले तर त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालये अस्तित्वात आहेत, हे राज्य सरकारांनी लक्षात घ्यावे, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली.

नक्की वाचा >> Arnab Goswami Case: जाणून घ्या कोण आहेत न्यायमूर्ती चंद्रचूड

याच निर्णयावर ट्विट करताना कुणालने न्या. चंद्रचूड यांची तुलना विमानातील कर्मचाऱ्यांशी केली होती. न्या. चंद्रचूड हे विमानातील कर्मचाऱ्याप्रमाणे आहेत जे प्रथम दर्जातील प्रवाशांना शॅम्पेन सर्व्ह करत आहेत. मात्र दुसरी सर्वसामान्यांना विमानात प्रवेश मिळेल की नाही हे ही ठाऊक नाही, अशा अर्थाचे ट्विट कुणालने केलं होतं. अन्य एका ट्विटमध्ये कुणालने, वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाला आणि न्यायमुर्तींना सन्माननिय म्हणणे सोडून द्यावे कारण सन्मान त्या वास्तूमधून कधीच निघून गेला आहे, अशी टीका केली होती. याचबरोबर कुणालने इतरही काही ट्विट केले होते ज्यामधून त्याने सर्वोच्च न्यायालय आणि भाजपावर टीका केली होती. याच प्रकरणी आता पुण्यातील दोन वकील आणि कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने केंद्र सरकारचे सर्वोच्च विधि अधिकारी असणारे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार केली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर वादग्रस्त शब्दांमध्ये टीका करणाऱ्या कुणाल कामराविरोधात न्यायालयाचा आणि न्याय व्यवस्थेचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करावी असं या तिघांनी म्हटलं आहे.

यापुर्वीही कुणाल कामराने उघडपणे अर्णबला विरोध करणारी अनेक वक्तव्य केली आहेत. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानामध्ये कुणाल कामराने अर्णबला सुनावले होते. त्यावरुन कंपनीने कुणालवर काही महिन्यांची प्रवास बंदीही घातली होती. आता पुन्हा एकदा अर्णबप्रकरणाबद्दल भाष्य करताना थेट सर्वोच्च न्यायालयावर टीका केल्याने कुणाल पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यात आहे.