राज्यातील खासदारांची पंतप्रधानांकडे मागणी
साखर उद्योगाला नियंत्रणमुक्त करण्याच्या डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशींची महाराष्ट्रात तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करून प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव जाहीर करण्यात यावा, अशा मागण्या महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटून केल्या.
स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष व हातकणंगल्याचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश जावडेकर, हंसराज अहीर, प्रताप सोनवणे, हरीभाऊ जावळे, विजय दर्डा, प्रताप जाधव, शिवाजीराव आढळराव पाटील, ए. टी. नाना पाटील, सुभाष वानखेडे, भाऊसाहेब वाकचौरे या महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने सकाळी संसद भवनात पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. रंगराजन समितीच्या शिफारशींवर विचार करण्यासाठी यूपीए सरकार कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याविषयी विचार करीत असल्याचे समजते. पण अशी समिती स्थापन केल्याने विलंब होईल.
रंगराजन समितीने पुरेसा विचार विनिमय करून शिफारशी सादर केल्या असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक वितरण व ग्राहक संरक्षण मंत्री के.व्ही.थॉमस यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना चालू मोसमातच आर्थिक लाभ मिळावे म्हणून या शिफारशी तात्काळ अंमलात आणल्या जाव्या, अशी मागणी राजू शेट्टी यांच्यासह इतरांनी केली.