दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची सुटका करण्यास मनाई करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे पीडित युवतीचे कुटुंबीय दिल्लीत दाखल झाले आहेत. या आरोपीची सुटका झाल्यास तो आमच्या कुटुंबीयांना धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे त्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात यावे, अशी मागणी पीडित युवतीच्या कुटुंबीयांनी केंद्रीय गृहमंत्री, दिल्ली उच्च न्यायालय व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली आहे. या आरोपीचे छायाचित्र व नाव अल्पवयीन असल्याने एकदाही प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
या आरोपीची मुक्तता न करता त्याला सुधारगृहातच ठेवण्याची मागणी भाजपे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. बाल न्याय मंडळाच्या निर्णयानुसार या आरोपीला २० डिसेंबरला सोडण्यात येणार आहे. केंद्रीय गृह खात्यानेदेखील आरोपीला काही काळ सुधारगृहात ठेवण्याची विनंती मंडळास केली होती. या आरोपीविरोधात समाजात चीड असल्याने त्याची प्रतिक्रिया उमटण्याची भीती गृह खात्याने वर्तवली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी उच्च न्यायालयाच्या निकालानंततर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. निर्भयाचे कुटुंबीय येत्या दोन दिवसांत स्वामींना भेटण्याची शक्यता आहे. संसदेत हिवाळी अधिवेशनात गेल्या तीन वर्षांपासून १६ डिसेंबरला या मुद्दय़ावर चर्चा होते. आता तर या प्रकरणातील आरोपीची सुटका होणार असल्याने पीडित युवतीचे कुटुंबीय संतप्त झाले आहेत.