लोकशाही आपली सर्वात मोठी ताकद आहे, त्यामुळे कुठल्याही किंमतीत तिचे रक्षण आपल्याला करावेच लागेल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमांतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एका अफगाणी खासदारासोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख करीत राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, एक दिवशी त्यांनी संसदेच्या व्हिजिटर गॅलरीमध्ये अफगाणिस्तानच्या काही खासदारांना बसलेले पाहिले. त्यावेळी सभागृहातला गोंधळ पाहून मला वाटले की हे खासदार परदेशातून आले आहेत आणि आपण गोंधळ घालत आहोत.

संसदेचे कामकाज संपल्यानंतर हेच अफगाणी खासदार माझ्या कार्यालयात आले. यावेळी मी त्यांना सभागृहात गोंधळामुळे चर्चा व्यवस्थित पाहता आली नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. यावर एक महिला अफगाण खासदार रडायला लागली, त्यावर मी आश्चर्यचकीत झालो आणि याचे कारण विचारले. यावर त्यांनी उत्तर दिले की, त्यांच्या देशात चर्चा ही एखाद्या बंदुकीसारखी असते.

या किस्साचा उल्लेख करताना राहुल गांधींनी म्हटले की, लोकशाही ही आपली सर्वात मोठी ताकद आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला तिचे रक्षण करावेच लागेल.