अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई करून त्यांना पदावरून हटविण्यासाठी काँग्रेसचे सदस्य अ‍ॅडम शिफ यांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रॅटिक सदस्यांनी बुधवारी सिनेटमध्ये जोरदार बाजू मांडली.

सिनेटमध्ये १०० सदस्य असून तेथे रिपब्लिकन सदस्यांचे संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना आपण व्हाइट हाऊसमधून हटवू शकणार नाही याची जाणीव असतानाही डेमोक्रॅटिक सदस्यांनी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवून जोरदार युक्तिवाद केला. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळविण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फसवणुकीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप डेमोक्रॅटिक सदस्यांनी सिनेटमध्ये सुरू असलेल्या महाभियोग कारवाईवरील चर्चेच्या वेळी केला.

लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प यांनी परदेशी हस्तक्षेप आणला, पुन्हा विजयी होण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी परदेशातून मदत मिळवून सत्तेचा गैरवापर केला, असा आरोप अ‍ॅडम शिफ यांनी सिनेटमध्ये केला. सत्तेचा गैरवापर करताना जेव्हा ट्रम्प पकडले गेले तेव्हा तपासामध्ये अडथळे आणण्यासाठीही त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, असेही शिफ म्हणाले. सिनेटमध्ये जोरदार युक्तिवाद करताना डेमोक्रॅटिक पक्षाचे शिफ यांनी, निवडणुकीत फसवणूक करण्यासाठी ट्रम्प यांनी सत्तेचा वापर केल्याचा, जोरदार आरोप केला. शिफ हे सभागृहाच्या गुप्तवार्ता कायमस्वरूपी निवड समितीचे अध्यक्ष आहेत.

आम्ही वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या घटनाक्रमाने महाभियोग कारवाईची सुरुवात केली आहे, वस्तुस्थिती धिक्कार करण्यासारखी आहे, आम्ही त्याचा घटनाक्रम सविस्तरपणे मांडण्याची सुरुवात केली आहे, असे शिफ यांनी सिनेटमध्ये बाजू मांडण्यासाठी जाण्यापूर्वी वार्ताहरांना सांगितले. अमेरिकेचा भविष्यातील अध्यक्ष देशापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणारा असेल, असे अमेरिकेचे संस्थापक अलेक्झांडर हॅमिल्टन यांनी म्हटले होते, त्याचा उल्लेख आपल्या भाषणाची सुरुवात करताना शिफ यांनी केला. देशाचे विद्यमान अध्यक्ष ट्रम्प हे, हॅमिल्टन आणि त्यांच्या समकालीनांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे वागले आहेत आणि त्यामुळेच आपण येथे कारवाईसाठी जमलो आहोत, असे शिफ म्हणाले.