पुढील निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये बहुमत मिळेल किंवा नाही याबद्दल संभ्रम असलेले डेमोक्रॅटिक पक्षांचे नेते ‘ओबामाकेअर’ विधेयक आपटल्यानंतर ओबामांपासून अंतर राखून राहू लागल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रस्तावित संकल्पनेनुसार ‘आरोग्यविषयक विमा विधेयका’चा लाभ किमान पाच लाख अमेरिकी नागरिकांना होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात हा लाभ केवळ एक लाख सहा हजार नागरिकांनाच होणार असल्याने डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा भ्रमनिरास झाला आहे.
‘ओबामाकेअर’साठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळ तांत्रिक कारणांमुळे बंद पडले आहे. त्यातच, चार लाख २० हजार अमेरिकी नागरिकांना त्यांचा आरोग्य विमा रद्द झाल्याची सूचना इन्शुरन्स कंपन्यांकडून पाठविली गेली आहे. या सगळ्याचा परिणाम अपरिहार्यपणे पुढील निवडणुकांवर होणार यात शंका नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळेच बराक ओबामा यांच्यापासून डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी अंतर राखून राहू लागले असल्याचे चित्र आहे.
अमेरिकेवर उद्भवलेल्या गंभीर आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढणाऱ्या डेमोकॅट्रिक पक्षावर अवघ्या सहा आठवडय़ांत अंतर्गत दुफळीची ही वेळ आली आहे. मात्र त्याचवेळी रिपब्लिक पक्षाच्या आढय़ताखोरीमुळेच ‘आरोग्य विमा विधेयक’ बारगळले असा आरोपही अनेक नागरिक करीत आहेत.