पाकिस्तानच्या हद्दीत असलेली दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करण्याचे प्रयत्न वाढवावेत, तसेच अफगाणिस्तानमधील अमेरिकन प्रतिष्ठापनांवरील मोठय़ा हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या धोकादायक हक्कानी नेटवर्कविरुद्ध ठोस कारवाई करावी, असे अमेरिकेने पाकिस्तानला रोखठोक शब्दांत सांगितले आहे.
रविवारी एका दिवसाच्या पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राइस यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ व लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्यासह पाकिस्तानच्या नेतृत्वाला हा कठोर संदेश कळवला.
क्षेत्रीय शांतता व स्थैर्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सीमेतील दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रयत्न आणखी तीव्र करावेत, असे राइस यांनी घेतलेल्या बैठकांदरम्यान सांगितल्याची माहिती व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दिली. अफगाणिस्तानमध्ये सध्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये झालेली वाढ पाहता
हक्कानी नेटवर्कविरुद्ध ठोस पावले उचलण्यासही त्यांनी पाकिस्तानला आग्रह केल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानी राजनीतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने उत्तर वझिरिस्तानात राबवलेल्या मोहिमेची राइस यांनी प्रशंसा केली, परंतु हक्कानी नेटवर्कविरुद्ध आणखी ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली. हा दहशतवादी गट उत्तर वझिरिस्तानात तळ ठोकून होता, परंतु लष्करी मोहिमेनंतर तो अफगाणिस्तानात पळून गेला, असे पाकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या उच्चपदस्थ सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला काबूलसोबतचे संबंध सुधारण्याचाही सल्ला दिला. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी शेजारी अफगाणिस्तानवर हल्ले चढवणे ‘मुळीच मान्य होण्यासारखे नाही’ असे राइस यांनी उच्चपदस्थ नागरी व लष्करी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. या दैनिकानुसार, काबूलमधील ताजी दहशतवादी हल्ल्यांची मालिका पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी घडवून आणल्याच्या अफगाणचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी अलीकडे केलेल्या आरोपांचा राइस यांच्या वक्तव्याला संदर्भ होता.
भारतामध्येही अलीकडे झालेले दहशतवादी हल्लेही सीमेपलीकडील दहशतवाद्यांनी केल्याच्या भारताच्या आरोपांचा मात्र राइस यांनी उल्लेख केला नाही.
राइस यांचा इस्लामाबाद दौरा बराच आधी निश्चित झाला होता व भारत- पाकिस्तानदरम्यान वाढणाऱ्या तणावाशी त्याचा काही संबंध नव्हता, असे या दैनिकाने म्हटले आहे.
अफगाणिस्तानात हल्ल्यांचे नियोजन करून ते घडवून आणण्यातील सहभागासाठी हक्कानी नेटवर्कचा सर्वोच्च नेता अझीझ हक्कानी याला अमेरिकेने गेल्याच आठवडय़ात ‘विशेष दर्जा असलेला जागतिक दहशतवादी’ जाहीर केले होते.