दूरसंचार मनोऱ्यांची मोडतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा सरकारने इशारा दिलेला असतानाही निदर्शने करणारे शेतकरी आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती असलेल्यांनी मंगळवारीही पंजाबमध्ये अनेक दूरसंचार मनोऱ्यांची मोडतोड केली.

रिलायन्स जिओच्या मनोऱ्यांना करण्यात येणारा विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला आणि केबलही कापून टाकण्यात आल्या. केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांमुळे उद्योगपती अंबानी आणि अदानी यांनाच जास्त लाभ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून त्याबद्दल असलेला राग त्या कंपन्यांच्या पायाभूत सुविधांवर काढण्यात आला.

मंगळवारी जवळपास ६३ मनोऱ्यांची मोडतोड करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी ज्या मनोऱ्यांची मोडतोड करण्यात आली होती त्यांची जिओने दुरुस्ती केली आहे.

अमृतसर, भटिंडा, चंडीगड, फिरोजपूर, जालंधर, लुधियाना, पठाणकोट, पतियाळा आणि संगरूर येथे मनोऱ्यांची मोडतोड करण्यात आली. जिओचे राज्यात नऊ हजारांहून अधिक मनोरे आहेत.

मोडतोड करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी पोलिसांना दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी असे प्रकार हानिकारक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कोणत्याही स्थितीत पंजाबमध्ये अनागोंदी होऊ दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिओची सरकारकडे  संरक्षणाची मागणी

नवी दिल्ली : पंजाबमध्ये अद्यापही दूरसंचार मनोऱ्यांची मोडतोड करण्याचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिओच्या अधिकाऱ्यांनी मनोऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. पंजाबमध्ये जवळपास १९०० मनोऱ्यांचा वीजपुरवठा मंगळवारी खंडित झाला होता. जिओच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मनोरे आणि अन्य दूरसंचार पायाभूत सुविधांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जवळपास दोन हजार मनोऱ्यांसह बेस ट्रान्सिव्हर केंद्रे आणि फायबरच्या केबल यांचीच मोडतोड करण्यात आली आहे, असे जिओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.