News Flash

नोटाबंदीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे आंदोलन, मोफत वाटल्या भाज्या

शेतकऱ्यांनी मोफत भाजी वाटून नोटाबंदीविरोधात आपला निषेध नोंदवला

छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांनी १ लाख किलो भाजी मोफत वाटली

नोटाबंदीमुळे आपल्या भाज्यांना भाव मिळत नाही असे म्हणत रायपूरच्या शेतकऱ्यांनी मोफत भाज्या वाटून आपला निषेध नोंदवला. नोटाबंदीमुळे फळे आणि भाज्यांचे भाव पडले आहेत. गुंतवणकीचा खर्च देखील भागत नाही त्यामुळे आम्ही आमची भाज्या फुकट वाटण्याचा निर्णय घेतल्याचे आंदोलकांनी म्हटले. रायपूरमध्ये बुधातलाब येथील धरना स्थळवर शेतकऱ्यांनी आपल्या भाज्या मोफत वाटल्या. मोफतची भाजी घेण्यासाठी रायपूरवासियांनी गर्दी केली होती. आपल्या मिनी ट्रक, आपे आणि टेम्पोमध्ये भरुन शेतकऱ्यांनी माल आणला होता. या आंदोलनाला संपूर्ण छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

अंदाजे १ लाख किलो भाजी २०,००० लोकांना मोफत वाटली गेली असे छत्तीसगड युवा प्रगतीशील किसान संघाचे अध्यक्ष हितेश वारू यांनी पीटीआयला सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये भाज्यांचे भाव कोसळले आहे. खुल्या बाजारात आणि ठोक बाजारात भाज्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या भाज्या सडत आहेत. टमाटे, शिमला मिर्ची, केळी, मिर्ची, कोबी आणि इतर भाज्यांचे भाव उतरले आहेत. दरवर्षी या हंगामात भाज्यांचे भाव थोडे-फार उतरतात परंतु नोटाबंदीमुळे तर ते अगदी तळाला गेल्याचे वारू यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी भाज्यांच्या उत्पादनावर गुंतवलेले पैसे देखील परत मिळेनासे झाले आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण वीजमाफी झाली पाहिजे आणि त्यांच्या उत्पन्नाला हमीभाव मिळाला पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याबरोबरच राज्यात शीतगृहांची व्यवस्था झाली पाहिजे असे देखील ते म्हणाले. राज्यात अन्नप्रक्रिया उद्योगांची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल एक तर फेकून द्यावा लागतो अथवा अत्यंत कमी भावात विकावा लागतो, असे ते म्हणाले.

ज्या भागात ऊसाचे उत्पन्न चांगले येऊ शकते त्या भागात जर साखर कारखाने लावण्यात आले तर शेतकरी ऊस काढू शकतील असे शेतकऱ्यांनी म्हटले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत कृषीमंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांना विचारले असता ते म्हणाले यावेळी नेहमीप्रमाणे बाहेरील राज्यातील व्यापाऱ्यांनी माल विकत न घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी शीतगृहांची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. या व्यतिरिक्त सौर ऊर्जेवर चालणारे ‘कॉम्पॅक्ट’ शीतगृह शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येईल असे ते म्हणाले. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना भाज्या मोफत वाटाव्या लागत आहेत याबाबत त्यांना विचारणा केला असता त्यांनी ही गोष्ट नाकारली. शेजारील राज्यातील व्यापारी न आल्यामुळेच त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावल्याचे अग्रवाल यांनी म्हटले.
मागील महिन्यात जशपूर आणि दुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळील शेकडो टन भाज्या फेकून दिल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 12:09 pm

Web Title: demometization free vegetables raipur farmer protest chchattisgarh
Next Stories
1 १२ वर्षाच्या चिमुकलीने वाचवली आईची अब्रू, नराधमांशी केले दोन हात
2 खिशाला अतिरिक्त भार; एटीएम आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर शुल्क भरावे लागणार
3 भारताकडून प्रेरणा घेत ऑस्ट्रेलियाही नोटाबंदीच्या विचारात
Just Now!
X